पवना नदीला आलेल्या पुराचे पाणी नवी सांगवीतील साई चौका नजिकच्या सोसायट्यामध्ये घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, सदैव नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे माजी नगरसेवक नवनाथ जगताप व ओम साई ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना सहकार्य करीत बोटीच्या साहाय्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
धुवाधार पावसामुळे पवना नदीला महापूर आला आहे. पवनेने रौद्ररूप धारण केले असून, पवनेचे पाणी घुसलेल्या नवी सांगवीतील कृष्णाई नगरी, इंद्रप्रस्थ सोसायटी, स्वस्तीश्री सोसायटी, पुष्पापार्क सोसायटी, शिवम सोसायटी आदी सोसायट्यातील २५० ते ३०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले. तसेच याच सोसायट्यातील काही ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना कार्यकर्त्यांच्या मदतीने बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. तसेच त्यांच्या राहण्याची, जेवणाची, औषधांची सोय केली. एवढेच नाही तर पुढील दोन – तीन दिवस त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. ज्यांना गरज असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांनी नागरिकांना केले आहे.
पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पवना नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहनही नवनाथ जगताप यांनी केले.